Metal Sector : जागतिक बाजारातून आलेल्या एका बातमीने भारत ते अमेरिकेपर्यंतच्या धातू बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीचा अहवाल समोर आल्यानंतर, सोन्या-चांदीसह तांब्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय वायदा बाजारात चांदीचे दर चक्क १९,००० रुपयांनी कोसळले असून, सोनेही १,००० रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे.
का पडले भाव? काय आहे कारण?
अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या डिसेंबरमधील बैठकीचे तपशील बुधवारी जाहीर झाले. यामध्ये समोर आले की महागाई पूर्णपणे आटोक्यात आली नसल्याने, फेड सदस्यांमध्ये व्याजदर कपातीवरून मतभेद आहेत. पुढील पूर्ण वर्षात केवळ 'एकदाच' व्याजदर कपात होण्याचे संकेत आहेत. यामुळे जानेवारीतील बैठकीत दर कपातीला 'ब्रेक' लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि युक्रेन दरम्यान शांतता चर्चेचे सकारात्मक संकेत मिळत असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचा ओघ कमी झाला आहे.
सोन्याच्या किमतीत घसरण
भारतात सोन्याचे दर १० ग्रॅमसाठी १,०४८ रुपयांनी घसरून १,३५,६१८ रुपयांवर* आले आहेत. काल हे दर १,३६,६६६ रुपये होते. तर जागतिक बाजारात अमेरिकेतील कॉमेक्स बाजारात सोन्याचे दर २८ डॉलर्सनी घसरून ४,३५८.५० डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.
चांदीची सर्वात मोठी पडझड
मंगळवारी ९ टक्क्यांनी वधारलेली चांदी आज पूर्णपणे कोलमडली आहे. भारतात चांदीचे दर थेट १९,००० रुपयांनी कोसळले असून, किंमत प्रतिकिलो २,३२,२२८ रुपयांवर आली आहे. काल चांदी २.५० लाखांच्या पार गेली होती. तर जागतिक बाजारात अमेरिकेत चांदी ७ टक्क्यांनी घसरून ७२.३७ डॉलर प्रति औंसवर आली आहे. युरोप आणि ब्रिटनच्या बाजारातही चांदी ५ टक्क्यांनी स्वस्त झाली आहे.
वाचा - १० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
तांबे देखील क्रॅश!
उद्योगांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तांब्याच्या किमतीतही मोठी पडझड झाली आहे. भारतात तांब्याचे दर ६ टक्क्यांनी घसरून १,२६१ रुपये प्रतिकिलो झाले आहेत. विशेष म्हणजे, या वर्षात तांब्याने आतापर्यंत ६५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर न्यूयॉर्कच्या बाजारात कॉपर फ्युचर्स ६.७५ डॉलर्सच्या घसरणीसह ५७१.४० डॉलरवर आले आहेत.
